Join us

IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच

हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघानं ठेवलेले आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 22:20 IST

Open in App

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं ग्वाल्हेरचं मैदान अगदी सहज मारलं. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला एकतर्फी पराभूत करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाला १९.५ षटकात १२७ धावांत आटोपलं होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय नोंदवला. भारतीय संघाला विजयासाठी २ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने हे आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले.

धावांचा पाठलाग करताना भारताकडून हार्दिक पांड्याच्या भात्यातून आली सर्वोच्च खेळी 

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. अभिषेक ७ चेंडूत १६ धावांची भर घालून रन आउट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या भात्यातूनही काही आकर्षक फटके पाहायला मिळाले. त्याने १४ चेंडूत२ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा नितेश रेड्डी १५ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. त्याच्या भात्यातूनही एक सिक्सर पाहायला मिळाला. मॅच फिनिश करणाऱ्या हार्दिक पांड्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांची नाबाद खेळी केली. जी भारतीय संघाकडून केलेली सर्वोच्च धावसंख्याही ठरली.

गोलंदाजीत अर्शदीपसह वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत दिसली जादू

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. भारताच्या ताफ्यातून पदार्पणाच्या सामना खेळणाऱ्या मयंक यादवसह, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. ३ वर्षांनी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीनं ४ षटकात ३१ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगनं ३.५ षटकात १४ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या.

बांगलादेशच्या संघाला ना बॅटिंग जमली ना बॉलिंगमध्ये काही पराक्रम दाखवता आला

बांगलादेशच्या संघाकडू कर्णधार शान्तो २७(२५) आणि मेहदी मिराज ३५(३२) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. त्यामुळे ते फक्त १२७ धावांपर्यंतच मजल मारू शकले. अल्प धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजीतही त्यांना धमक दाखवता आली नाही. मुस्तफिझुर रहमान आणि मेहदी मिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. अन्य गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेशहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव