IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आता सज्ज झाले आहेत. यावेळी पहिल्यांदाच या स्पर्धेत ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. २२ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ दशक भरातील अपयश भरून काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाने २०१४ नंतर एकदाही भारताविरुद्ध ही मालिका जिंकलेली नाही. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी पॅट कमिन्स याने आपल्या फलंदाजाला खास संदेश दिला आहे. वॉर्नरच्या शेळीला कॉर्नर देऊन तुझा खेळ दाखव, असा सल्ला त्याने टीम इंडियाविरुद्ध पदार्पणासाठी सज्ज असलेल्या भिडूला दिलाय.
कोण आहे वॉर्नरची जागा घेणारा नवा भिडू?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात आतापर्यंत डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळाले होते. पण त्याने निवृत्ती घेतल्यानंतर आता नॅथन मॅक्सवीनी (Nathan McSweeney) त्याची जागा घेणार आहे. पॅट कमिन्स यानं पदार्पणासाठी सज्ज असलेल्या आपल्या ताफ्यातील सलामीवीराला खास आणि मोलाचा संदेश दिला आहे. त्याने डेविड वॉर्नरसारखे खेळण्याची अजिबात गरज नाही. त्याने आपल्या नैसर्गिक खेळ करावा, असे पॅट कमिन्स म्हणाला आहे.
नेमकं काय म्हणाला पॅट कमिन्स
पर्थ कसोटी सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना पॅट म्हणाला की, डेविड वॉर्नरचा रिप्लेसमेंट मिळणं मुश्कील आहे. नॅथन याने डेविड वॉर्नरप्रमाणे ८० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढण्याची गरज नाही. तो त्याचा खेळच नाही. ख्वाजाच्या साथीनन नॅथनमॅक्सवीन संघाला चांगली सुरुवात करुन देईल, अशी अपेक्षा आहे. उस्मान ख्वाजा गोलंदाजांना मोठे स्पेल टाकायला भाग पाडतो. नॅथनचा खेळही याच धाटणीतील आहे, असे पॅट म्हणाला. याचा अर्थ असा की, ख्वाजा प्रमाणे तू फक्त भारतीय गोलंदाजांना दमवण्याचा डाव खेळ, असा सल्लाच त्याने आपल्या सलामीवीराला दिल्याचे दिसते.
टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलेंड, एलेक्स कॅरी, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नाथन मॅकस्वीनी, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क.