IND vs AUS, Border Gavaskar Trophy भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत पहिल्यांदाच ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानातून भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानातील जिव्हारी लागणाऱ्या या पराभवामुळं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वबळावर टिकून राहण्यासाठी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका ही 'करो वा मरो' अशी झालीये.
जुनं मैदान सोडलं आता टेस्ट मॅच आधी टीम इंडियाची नव्या मैदानात प्रॅक्टिस
पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघानं पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या (WACA) मैदानात सराव केल्याचे पाहायला मिळाले. पर्थमधील हे कसोटी सामन्यांचे जुने मैदान आहे. पण भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील जो पहिला कसोटी सामना आहे तो पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ज्या मैदानात सामना खेळायचा आहे तिथंही भारतीय संघ सराव करणार आहे. यासाठी भारतीय संघातील खेळाडू नव्या स्टेडियमवर पोहचल्याचे स्पॉट झाले.
शुबमन गिलशिवाय दिसली टीम इंडिया
पहिल्या पर्थ कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. शुबमन गिल दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याच्याशिवायच टीम इंडिया प्रॅक्टिससाठी ऑफ्टस स्टेडियमवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. इएसपीएनच्या एक्स अकाउंटवरून टीम इंडियाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात कोच गौतम गंभीरसह विराट कोहली, जड्डू आणि अश्विन यासह अनेक खेळाडूंची झलक पाहायला मिळते.
रोहितच्या अनुपस्थिती बुमराहच्या खांद्यावर कॅप्टन्सीचं ओझं
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रित बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. गोलंदाजीतील कर्तृत्वासह नेतृत्वाची खास छाप सोडण्याचे एक मोठं चॅलेंज त्याच्यासमोर असेल. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात टीम इंडियानं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. पण यावेळी त्यापेक्षा मोठं चॅलेंज आहे. कारण स्वबळावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाला ४-० अशी जिंकायची आहे.