ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात जलदगती गोलंदाज हर्षित राणानं अगदी झोकात पदार्पण केले आहे. कॅप्टन बुमराहनं सेट करुन दिलेल्या उत्तम प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करत हर्षित राणानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली विकेट घेतली. एकदा नव्हे तर दोन वेळा ICC ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयाआड आलेल्या धडाकेबाज फलंदाजाच्या रुपात त्याने ही पहिली विकेट घेतली.
Harshit Rana ची पहिली विकेट; टीम इंडियाच्या 'जानी दुश्मन'चा खेळ असा केला खल्लास
आता तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे ट्रॅविस हेड. २०२३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हाच खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला होता. त्याच्या खेळीमुळेच टीम इंडियाच्या हातून ट्रॉफी उंचावण्याची संधी हुकली होती. त्या ट्रॅविस हेडला अर्थात टीम इंडियाच्या जानी दुश्मनला हर्षित राणानं अप्रतिम स्विंगवर चकवा दिला. बोल्ड आउट झाल्यावर ट्रॅविस हेडही आवाक् झाल्याचे पाहायला मिळाले.
आधी एका ओव्हरमध्ये दोन खणखीत चौकार, मग दोघांनी एकमेकांना खुन्नसही दिली
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हर्षित राणानं ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाजाला बोल्ड केले. त्याआधीच्या ओव्हरमध्ये दोघे एकमेकांना खुन्नस देतानाचा सीन पाहायला मिळाला होता. ट्रॅविस हेडनं हर्षित राणाच्या आधीच्या षटकात एका ओव्हरमध्ये दोन खणखणीत षटकार मारले होते. त्यावेळी दोघांच्यात एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला होता. त्यानंतरच्या षटकात हर्षितनं आपल्या गोलंदाजीतील कमालीचा स्विंग दाखवून देत ट्रॅविस हेडचा खेळ खल्लास केला. तो ११ धावांची भर घालून माघारी फिरला.
हर्षितच्या पहिल्या विकेटच खास सेलिब्रेशन; चाहत्यांकडूनही मिळाली दाद
पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेट त्यातही मोठा मासा गळाला लागल्यामुळे हर्षित राणाचा आनंद गगनात मावेना असा होता. आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणाचे त्याने खास आपल्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्याच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटला प्रेक्षकांनीही दाद दिली. एवढेच नाही तर सोशल मीडियावरही त्याच्या पहिल्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.