Australia playing 11 for Adelaide test against India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडिलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पिंक बॉल टेस्टसाठी एक दिवस आधीच ऑस्ट्रेलियन संघाने आपली बेस्ट प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. जोश हेजलवूड संघाबाहेर असून त्याच्या जागी स्कॉट बोलंड याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. जोश हेजलवूडसाठी आयपीएलच्या मेगा लिलावात RCB च्या संघानं १२ कोटी ५० लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होते. तो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
सराव सामन्यात विकेटसाठी संघर्ष करणाऱ्या गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
भारतीय संघानं अॅडिलेड कसोटी आधी कॅनबेराच्या मैदानात ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळला होता. या सामन्यात स्कॉट बॉलंड ऑस्ट्रेलियन ताफ्यातून खेळताना दिसला होता. त्याने १० सर्वाधिक १० षटके टाकली होती. पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. हा सामना भारतीय संघाने जिंकला होता.
दिवस रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबदबा
ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक १२ दिवस रात्र कसोटी सामने खेळले आहेत. संघाकडून मिचेल स्टार्कनं सर्वाधिक ६६ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने तीन वेळा पाच विकेट्स हॉलचा पराक्रमही नोंदवलाय. त्याच्या पाठोपाठ विकेट घेण्यात नॅथन लायन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या फिरकीपटूच्या खात्यात ४३ विकेट्स आहेत. कांगारुंच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या पॅट कमिन्सनं ७ सामन्यात ३४ विकेट्स घेतल्या आहेत. पिंक बॉल टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संगाची प्लेइंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिंन्स (कर्णधार), नॅथन लायन, स्कॉट बोलंड.
भारतीय संघानं पर्थ कसोटी सामन्यात यजमान संघाला मोठा धक्का दिला होता. पहिल्या डावात १५० धावांत आटोपल्यानंतर जबरदस्त कमबॅक करत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. या पराभवाची परतफेड करून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे भारतीय संघ याआधी डे नाइट कसोटी सामन्यातील हिशोब बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल.