IND vs AUS, 3rd Test: Jasprit Bumrah breaks Kapil Dev’s record : जसप्रीत बुमराहने बुधवारी ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात कपिल देवला यांचा विक्रम मोडीत काढला. भारतीय संघाचा डाव २६० धावांत आटोपल्यावर पावसाच्या व्यत्ययामुळे मोठ्या ब्रेकनंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं सलामीवीर उस्मान ख्वाजाला ७ (८) तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह बुमराहनं टीम इंडियाला पहिलं यश तर मिळवून दिलेच. याशिवाय त्याने कपिल पाजींच्या विक्रमाशीही बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ख्वाजा बुमराहाचा ५१ वा शिकार ठरला.
मार्नस लाबुशेनंला तंबूत धाडत साधला विक्रमी डाव
त्यानंतर जसप्रीत बुमराहनं मार्नस लाबुशेनच्या रुपात दुसरी विकेट्स घेतली. यासह ऑस्ट्रेलियन मैदानात बुमराहनं ५२ विकेट्स आपल्या नावे केल्या. याआधी कपिल पाजींनी ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वाधिक ५१ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड होता. हा विक्रम मोडीत काढत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत टॉपर ठरला आहे.
अबतक ५३ !
३१ वर्षीय जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यात २१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ब्रिस्बेनच्या गाबा कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियात त्याच्या नावे आता ५३ विकेट्स जमा झाल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात हा रेकॉर्ड तो आणखी उत्तम करेल, यात शंका नाही.
दोनच भारतीय गोलंदाजांना जमलीये ही कामगिरी
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि कपिल देव या दोघांनीच ५० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात ४९ विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज कोण माहितीये?
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज बॉलर कर्टली ॲम्ब्रोज (Curtly Ambrose) यांच्या नावे आहे. कॅरेबियन गोलंदाजानं १४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन मैदानात ७८ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
Web Title: IND vs AUS, 3rd Test: Jasprit Bumrah breaks Kapil Dev’s record, becomes leading Indian wicket-taker in Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.