IND vs AUS, 2nd Test Day 1 : बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चेंडूच्या रंगासोबतच कांगारुंच्या संघानंही आपला रंग बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने दमदार कमबॅक केले आहे. बुमराहाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दिवस रात्र कसोटी सामना जिंकून ही आघाडी भक्कम करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला. पण गुलाबी चेंडूवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियानं गाजवला. गोलंदाजीसह फलंदाजीतही त्यांनी टीम इंडियाला मागे टाकल्याचे दिसून आले.
अवघ्या १८० धावांत आटोपला भारतीय संघाचा पहिला डाव
अॅडिलेड कसोटी सामन्यात नियमित कॅप्टन रोहित शर्मासह शुबमन गिल आणि अश्विनची संघात एन्ट्री झाली. रोहित शर्मानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर गुलाबी चेंडूवर टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. नितीश रेड्डीनं केलेल्या जिगरबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या खेळातील पहिल्या डावात १८० धावांपर्यंत मजल मारली.
बुमराह संघाला पहिलं यश मिळवून दिलं, पण...
पर्थ कसोटीच्या तुलनेत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावा अधिक काढल्या. पण यावेळी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला कमबॅक करता आले नाही. भारतीय संघाचा डाव आटोपल्यावर उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर २४ धावा असताना जसप्रीत बुमराहनं भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. उस्मान ख्वाजाला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. ३५ चेंडूचा सामना केल्यावर ख्वाजा मुंबईचा राजा रोहित शर्माकडे झेल देऊन अवघ्या १३ धावांवर माघारी फिरला.
मॅकस्वीन अन् मार्नस जोडी जमली
युवा सलामीवीर नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लाबुशने या जोडीनं अगदी संयमी खेळी करत दिवसाअखेर नाबाद राहून संघाच्या धावफलावर ८६ धावा लावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी नॅथन मॅकस्वीनी ९७ चेंडूचा सामना करून ३८ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला मार्नस लाबुशेनं याने ६७ चेंडूचा सामना करताना ३ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या खेळात गोलंदाजी वेळी स्टार्कचा भेदक मारा त्याला पॅट कमिन्स आणि बोलंडची मिळाली साथ याच्या जोरावर भारतीय संघाला २०० धावांच्या आत रोखून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. फलंदाजीत पहिली विकेट लवकर गमावल्यावर सेट झालेली जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसली. गोलंदाजीनंतर फलंदाजीतही धमक दाखवत मालिकेत पिछाडीवर असेलल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिला दिवस गाजवत टीम इंडियाला 'टेन्शन' दिलं. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज टीम इंडियाचं टेन्शन कमी करणारा मारा करणार का? ते पाहण्याजोगे असेल. गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा संघाचा रेकॉर्ड सर्वोत्तम आहे.