Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहली सध्या संपूर्ण ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय आहे. मीडियापासून ते क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत सर्वत्र कोहलीच्या नावाचीच चर्चा आहे. चार वेळा पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकायचाच आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला रोखणे ऑस्ट्रेलियाला गरजेचे आहे. त्यामुळे संघाचे विविध माजी खेळाडू विराट विरुद्ध आपापले प्लॅन्स सांगत आहेत. आता अनुभवी गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही विराट कोहलीवर दबाव आणण्यासाठी उपाय सुचवला आहे.
- मॅकग्रा काय म्हणाला?
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला नाकीनऊ आणणारा गोलंदाज म्हणजे ग्लेन मॅकग्रा. ब्रेट लीनंतर मॅकग्रानेच सचिनला सर्वाधिक वेळा बाद केले आहे. आता त्यानेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विराटला रोखण्यासाठी कानमंत्र दिला आहे. फॉक्स क्रिकेटवर बोलताना मॅकग्रा म्हणाला की, विराटला 'भावनिक' पद्धतीने दबावात आणलं जाऊ शकते.
"भारतीय संघ नुकताच न्यूझीलंड विरूद्ध ३-० ने हरला आहे. अशा वेळी त्यांचे सर्वच खेळाडू आताच्या कसोटी मालिकेत सर्व शक्तनिशी उतरतील यात वाद नाही. पण विराट कोहली हा एक भावनिक खेळाडू आहे. खेळात त्याच्या भावना गुंतलेल्या असतात. न्यूझीलंड च्या विरोधात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. जर ऑस्ट्रेलियाने त्याला कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या २-३ डावात स्वस्तात बाद केले तर त्याच्यावर दबाव वाढेल आणि त्याचा ऑस्ट्रेलियाला खूप फायदा होईल. विराट सारखे खेळाडू पटकन सावरतात आणि मैदानात धमाका करू शकतात. त्यामुळे त्याला सुरुवातीलाच थोडासा दबावात आणले तर तो ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार नाही," अशा शब्दांत ग्लेन मॅकग्राने विराटविरूद्धचं प्लॅनिंग सांगितले.
- ऑस्ट्रेलियात विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीसाठी हे वर्ष कसोटीत चांगले राहिलेले नाही. २०२४ मध्ये, तो फक्त ६ कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो केवळ २३ च्या सरासरीने धावा करू शकला आहे. अशा स्थितीत त्याच्यावर धावा करण्याचे खूप दडपण आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील त्याचे आकडे जबरदस्त आहेत. त्याने ऑस्ट्रेलियात १३ सामन्यात ५४च्या सरासरीने १,३५२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ६ शतकेही झळकावली आहेत. त्यामुळे प्रत्येक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटवर चाहत्यांची विशेष नजर असते.