Suryakumar Yadav On 2026 T20 World Cup Preparation : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारी १९ डिसेंबरपासून पाच सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. कटकच्या मैदानातून रंगणारी ही मालिका आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मालिकेला सुरुवात होण्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत सहभागी झाला. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसह भारतीय टी-२० संघाच्या कर्णधाराला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सूर्यकुमार यादवनं शाळेतील उदाहरण देत संघाची तयारी कधीपासून सुरु झाली आहे, त्यासंदर्भातील खास गोष्ट सांगितल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"शाळेत परीक्षा देताना आपण चार दिवस आधी.." वर्ल्ड कपच्या तयारीसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
पहिल्या टी-२० सामन्याआधी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला की, "टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची तयारी आम्ही २०२४ चा टी २० वर्ल्ड कप संपल्यावर लगेचच सुरू केली. कोणत्याही मोठ्या स्पर्धेची तयारी एक-दोन महिने आधी होत नाही. शाळेत परीक्षा देताना आपण चार दिवस आधी अभ्यास सुरू करत नाही, संपूर्ण वर्षभर अभ्यास करतो. अगदी तसंच आमचंही आहे. तयारी खूप आधी सुरू झाली. तेव्हापासून तुम्ही पाहिलं असेल, आम्ही सतत नवीन गोष्टी आजमावत आहोत आणि त्या आमच्यासाठी फायद्याच्या ठरत आहेत."
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
सर्व काही ठीक सुरु आहे अन् तेच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करु
२०२४ च्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाने सातत्यपूर्ण दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ४ वेळा पराभवाचा सामना केला, पण एकही मालिका गमावली नाही. संघ निवडीवेळी मोठा फेरबदल न करता संघात स्थिरता प्रस्थापित केली आहे. हे सातत्यपूर्ण यशामागचं कारण असून पुढेही हास सिलसिला कायम ठेवू, असा विश्वासही सूर्यकुमार यादवनं यावेळी व्यक्त केला आहे.
टी-२० वर्ल्ड कप आधी दोन मालिका आणि १० सामने
भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आता काही महिने शिल्लक आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसह न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत दबदबा कायम राखत टीम इंडिया वर्ल्ड कप विजेतेपदाची आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.