Join us
Daily Top 2Weekly Top 5

RCB vs DC: शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर 224 धावांचे आव्हान 

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:10 IST

Open in App

shafali verma wpl । मुंबई : आज महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीच्या संघाने शानदार सुरूवात केली आहे. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीला सुरूंग लावला. दोघींनी पहिल्या बळीसाठी 162 धावांची विक्रमी भागीदारी नोंदवली. शेफाली वर्माच्या (84) धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभारला आहे. 

तत्पुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर शेफाली वर्मा (84) आणि मेग लॅनिंग (72) यांनी स्फोटक खेळी केली. कर्णधार लॅनिंगने 43 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 72 धावा चोपल्या. तर शेफाली वर्माने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 84 धावा केल्या. 14 षटकांपर्यंत आरसीबीला एकही बळी घेता आला नाही, मात्र पंधराव्या षटकांत हेथर नाईट हिने दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांना बाहेरचा रस्ता दाखवला.  

शेफाली-लॅनिंगच्या जोडीने स्फोटक सुरूवात केल्यानंतर जेमिमा आणि मारिझान कॅप यांनी शानदार खेळी करून धावसंख्या 200 पार नेली. दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिझान कॅप हिने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 39 धावांची ताबडतोब खेळी केली, तर जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद 22 धावा केल्या. अखेर दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 223 धावा करून स्मृती मानधनाच्या आरसीबीला विजयासाठी 224 धावांचे तगडे आव्हान दिले. 

 आजच्या सामन्यासाठी RCBचा संघ - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, दिशा कासट, एलिसे पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), हेथर नाईट, कानिका अहुजा, सोभना आशा, मेगन शुट, प्रीती बोस, रेणुका सिंग. 

आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ -मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅलिस कॅप्सी, जेस जॉनसन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), अरूधंती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगस्मृती मानधनादिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरटी-20 क्रिकेट
Open in App