Join us

ऑस्ट्रेलियाचा विजय, न्यूझीलंडचा दारुण पराभव आणि फायदा टीम इंडियाचा, WTC क्रमवारीत घेतली अव्वलस्थानी झेप

ICC World Test Championship: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर १७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा विजय आणि न्यूझीलंडच्या झालेल्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:52 IST

Open in App

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर १७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी  आघाडीही घेतली आहे.  मात्र ऑस्ट्रेलियाचा विजय आणि न्यूझीलंडच्या झालेल्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. आजच्या निकालानंतर आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली असून, भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे न्यूझीलंडच्या गुणांमध्ये घट होऊन ते ६० टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे डब्ल्यूटीसीच्या सुधारित क्रमवारीत ६४.५८ टक्के गुणांसह भारतीय संघाला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तर ५९.०९ टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया या क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८३ धावा फटकावल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १७९ धावांत गारद झाला होता. पहिल्या डावातील २०४ धावांच्या आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव मात्र १६४ धावांत आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३६९ धावांचं आव्हान होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करणं न्यूझीलंडला कठीण गेलं. अखेर न्यूझीलंडचा डाव १९६ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला १७२ धावांनी विजय मिळाला. ऑस्ट्रेल्याकडून नाथन लियॉनने सामन्यात १० बळी टिपले. तर पहिल्या डावातील शतकवीर कॅमरून ग्रीन याने एकूण २०८ धावा काढल्या.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियान्यूझीलंड