Maharashtra Govt Felicitates Smriti Mandhana Jemimah Rodrigues Radha Yadav With 2 Crore 25 Lakh : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महिला क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा मुंबईत खास सत्कार सोहळा पार पडला. शुक्रवारी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित समारंभात भारतीय महिला संघातील महाराष्ट्राच्या प्रमुख खेळाडूंसह संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यही उपस्थितीत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादवचा प्रत्येकी २ कोटी २५ लाखांचा धनादेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्यावर भारताच्या तिन्ही 'रन'रागिणींना बक्षीस स्वरुपात प्रत्येकी २ कोटी २५ लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला. भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२. ५ लाख रुपयांचा धनादेश तर सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्यांना प्रत्येकी ११ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. यावेळी गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी, विश्लेषक अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर अपर्णा गंभीरराव, तसेच सपोर्ट स्टाफ सदस्य मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे आणि ममता शिरुरुल्ला देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून जय शाह यांचा खास उल्लेख
याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या विजयाने देशातील प्रत्येक तरुणीला खेळात पुढे जाण्याची आणि जागतिक स्तरावर नाव कमवण्याची प्रेरणा मिळेल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जय शाह यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून शाह यांनी महिला क्रिकेटच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.
स्मृती मानधासह अमोल मुजुमदार यांनीही व्यक्त केली भावना
राज्य सरकारकडून मिळालेल्या सन्माननंतर भारतीय महिला संघाची उपकर्णधार
स्मृती मानधना म्हणाली की, मुंबईत सन्मान मिळणे आमच्यासाठी खूप खास आहे. २०१७ मध्ये आम्ही उपविजेते ठरलो. त्यावेळीही आमचा सन्मान करण्यात आला होता. कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट टीमशिवाय विश्वविजेतेपद मिळवणे शक्यच नव्हते. मुंबईच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवू याची खात्री होती. या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनी दिवस-रात्र मेहनत घेतली. हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्र आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी गौरवाचा सुवर्णक्षण आहे, अशी भावना भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी व्यक्त केली.