ICC T20 World Cup Matches Live Streaming : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील १३ व्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रंगणार आहे. हा सामना करामती खानच्या अफगाणिस्तानसाठी करो वा मरो असा आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाकडून अफगाणिस्तानला पराभवाचा धक्का बसला होता. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी ही लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कॅनडाविरुद्धचा सामना जिंकून यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयासह केली आहे. सलग दुसरी लढत जिंकून ते सुपर ८ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी मैदानात उतरतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० वर्ल्ड कपच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघही आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. याशिवाय सायंकाळच्या सत्रात दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडला भिडणार आहे. इथं एक नजर टाकुयात कोणता संघ कोणत्या मैदानात उतरणार? कसा पाहता येईल टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ट्रिपल हेडरचा थरार यासंदर्भातील सविस्तर माहिती.
T20 World Cup: अभिषेक शर्मा रुग्णालयात; भारताचा 'नवा भिडू' तयार! नेट्समध्ये केला कसून सराव
डेथ ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेला मात देत अफगाणिस्तान स्पर्धेत टिकणार?
बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या दिवसातील पहिला सामना खेळवण्यात येईल. सकाळी ११ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबादची खेळपट्टी ही फिरकीसाठी अनुकूल असून या मैदानात अफगाणिस्तानचा संघ चमत्कार करून स्पर्धेतील आपले आव्हान टिकवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
ऑस्ट्रेलिया आयर्लंड यांच्यात रंगणार दुसरा सामना
दुपारच्या सत्रात ग्रुप बी मधील ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. हा सामना कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयर्लंडच्या संघाला सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेन पराभूत केले होते.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्याने होणार पाचव्या दिवसाची सांगता
दोन वेळचा टी-२० वर्ल्ड कप विजेता वेस्ट इंडिजचा संघ सायंकाळच्या सत्रात इंग्लंडला भिडणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली होती. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने नेपाळविरुद्ध रडत खडत विजय नोंदवला होता.
कुठे पाहता येतील T20 World Cup स्पर्धेतील सामने?
टी २० वर्ल्ड कप २०२६ मधील सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.