आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा आता रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील शेवटचे काही सामने शिल्लक असताना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने उपांत्य फेरीमधील आपलं स्थान पक्कं केलं आहे. तर उर्वरित दोन जागांसाठी एका गटामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज तर दुसऱ्या गटामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यात रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे, अशा परिस्थितीत टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली तर तिथे टीम इंडियाची गाठ कुणाशी पडणार याबाबत भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्सुकता दिसून येत आहे. आता उपांत्य फेरीमधील लढतींचं संपूर्ण समीकरण समोर आलं आहे.
सुपर ८ फेरीतील गट १ मध्ये दक्षिण आफ्रिकेने आपले सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं. तर गट-२ मध्ये इंग्लंडने आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता गट १ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज तर गट २ मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस दिसून येत आहे.
आता उपांत्य फेरीतील समीकरणांनुसार गट १ मध्ये अव्वलस्थानी राहिलेल्या संघाचा सामना गट २ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघासोबत होणार आहे. तर गट २ मध्ये पहिल्या स्थानावर राहणाऱ्या संघाचा सामना गट १ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघासोबत होणार आहे.
सद्यस्थितीत वेस्ट इंडिजला नमवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तरी नेट रनरेट पाहता गट १ मध्ये तो दुसऱ्या क्रमांकावरच राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेची धावगती खूप चांगली असून, झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव होण्याची शक्यता कमी आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेकडून पराभव झाला तरी दक्षिण आफ्रिकाच पहिल्या स्थानावर राहणार आहे. त्यामुळे गट १ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या भारताचा सामना हा गट २ मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडशी होऊ शकतो.
तर गट क्रमांक १ मध्ये अव्वलस्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेची गाठ उपांत्य फेरीत गट क्रमांक २ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या न्यूझीलंड किंवा पाकिस्तानशी पडू शकते.