ICC T20 World Cup 2026 Tim David Would Sit Out The Ireland Clash : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन संघ ११ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहे. या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू टिम डेविड दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून टिम डेविड 'आउट'
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने स्वतः याची पुष्टी केली आहे. टिम डेविड अद्यापही हॅमस्ट्रिंग दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही. संघ व्यवस्थापन त्याला खेळवण्यासंदर्भात कोणतीही घाई करणार नाही. पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ऑस्ट्रेलियन कर्णधाराने म्हटले आहे. गतवर्षी बॉक्सिंग डे नंतर टिम डेविडने एकही सामना खेळलेला नाही. बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. गेल्या आठवड्यात तो श्रीलंकेत ऑस्ट्रेलियन संघासोबत सहभागी झाला. त्याने जोरदार सरावही केला. पण सामना खेळण्यासाठी तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही.
T20 World Cup 2026 स्पर्धेत यजमान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
टिम डेविडच्या जागी मॅट रेनशॉला संधी?
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत मिचेल मार्श याला टिम डेविडच्या दुखापतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कर्णधार म्हणाला की, तो पहिल्या सामन्याला मुकणार असला तरी आगामी काही सामन्यांमध्ये टिम डेविड निश्चित मैदानात खेळताना दिसेल. टिम डेविडच्या जागी सलामीच्या सामन्यात मॅट रेनशॉ याला संधी मिळण्याची शक्यता आहे. रेनशॉने आतापर्यंत फक्त ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
नॅथन एलिस पूर्णपणे तंदुरुस्त; ऑस्ट्रेलियाला दिलासा
या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला एक चांगली बातमी देखील मिळाली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी तो सज्ज आहे. ऑस्ट्रेलियन संघ २०११ नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व नॅथन एलिस करताना दिसणार आहे.