ICC T20 World Cup 2026 IND vs USA Abhishek Sharma Golden Duck : गत टी-२० चॅम्पियन भारतीय संघाने मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाचा फलंदाजांचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला अली खान याने खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळताना अभिषेक शर्मावर विद्यमान कोच आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरसारखी वेळ आली. टी-२० वर्ल्ड कपच्या पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा पाचवा भारतीय ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा गोल्डन डकचा शिकार
मोनांक पटेल याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर अमेरिकन गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या षटकात नेत्रावळकरनं एका षटकारासह फक्त ७ धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात इशान किशन याने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक अभिषेक शर्माला दिले. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा संजय कृष्णमुर्तीच्या हाती झेल देऊन तंबूत परतला.
IND VS USA, T20 World Cup 2026: संजूसह बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून OUT; सिराजला संधी, कारण...
याआधी हे चार भारतीय टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात ठरले होते 'झिरो'
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात याआधी चार भारतीय शून्यावर बाद झाले होते. यात गौतम गंभीर, आशिष नेहरा आणि शार्दुल ठाकूरसह दिपक हुड्डाच्या नावाचा समावेश आहे. या यादीत आता अभिषेक शर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे.