ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने सुरुवात करणार आहे. भारतीय संघाने २००७ चा पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यानंतर १७ वर्ष त्यांना पुन्हा हा करिष्मा करता आलेला नाही. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ICC स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने ही घोडदौड रोखली. आता टीम इंडियाला कोणतीच कसर सोडायची नाही. पण, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संकट ओढावले आहे.
रोहित शर्मा ४ ऑल राऊंडरसोबत खेळण्याच्या तयारीत? पण अंगलट येऊ शकतो हा निर्णय
न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने होणार आहेत आणि पहिला सामना आज आयर्लंडविरुद्ध आहे. यानंतर टीम इंडियाला ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) यांच्याशिवाय कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये खेळायचा आहे. अमेरिकेत प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत आहे आणि तेथील लोकांना त्याची उत्सुकता आहे. पण, येथील हवामान त्यांच्या आनंदावर पाणी फिरवायचं काम करत आहे. काल Bridgetown येथे इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड सामन्यात पावसाने बॅटिंग केली आणि गतविजेत्यांना १ गुणावर समाधान मानावे लागले.
आज भारताचा सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे आणि तेथे सध्या ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्यानुसार सध्या तेथील तापमान हे २५ डिग्री सेल्सिअस आहे आणि रात्री तेथे पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारत-आयर्लंड यांच्यातला सामना हा तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता होत आहे आणि या सामन्याला पावसाचा धोका नाही. पण, सध्या ढगाळ वातावरण दिसत असल्याने चाहते चिंतित आहेत. ही मॅच रद्द करावी लागल्यास दोन्ही संघांना १-१ गुण मिळेल आणि ही गोष्ट टीम इंडियाची डोकेदुखी वाढवू शकते. कारण, या गटात पाकिस्तानसारखा कट्टर संघ समोर आहे.

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद