ICC Rankings Update : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-२० क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंह यांनी मोठी झेप घेतली आहे. टी-२० क्रमवारीत अभिषेक शर्मानं आपला दबदबा कायम ठेवला असून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी तो ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर आहे. इथं जाणून घेऊयात न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतील कामगिरीच्या जोरावर ICC क्रमवारीत भारतीय संघातील कोणत्या खेळाडूने कोणत्या स्थानावर झेप घेतली त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅक टू बॅक फिफ्टी अन् सूर्या दादाची टॉप १० मध्ये एन्ट्री
भारतीय टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी २०२५ हे वर्ष खूपच खराब गेले. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने नव्या वर्षाची सुरुवात एकदम दमदार केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात ३२ धावांवर अडखळलेल्या सूर्यानं दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे ८२ आणि ५७ धावांची नाबाद खेळी केली. याचा त्याला आयसीसी टी-२० क्रमवारीत फायदा झाला असून तो पुन्हा आघाडीच्या १० फलंदाजांच्या यादीत आला आहे. पाच स्थानांच्या सुधारणेसह सूर्यकुमार यादव ICC टी-२० क्रमवारीत सातव्या क्रमांकावर पोहचला आहे.
बांगलादेशी खेळाडूंना भीती, पण पत्रकारांना प्रवेश हवा! ८०-९० क्रीडा पत्रकारांनी ‘मीडिया अॅक्रिडिटेशन’साठी क...
अभिषेक शर्मा ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर
टी २० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा ९२९ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा फिल सॉल्ट (८४९ रेटिंग), तर तिलक वर्मा (७८१ रेटिंग) तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर जोस बटलर, तर पाचव्या स्थानावर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान असल्याचे दिसून येते. अभिषेकची ९२९ रेटिंग ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ९३१ रेटिंगपेक्षा अवघ्या दोन गुणांनी कमी आहे, जी त्याने मागील वर्षी आशिया कपदरम्यान मिळवली होती. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत दमदार कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित करण्यावर त्याचं लक्ष असेल.
रिंकू सिंहसह शिवम दुबेलाही फायदा
शिवम दुबे नऊ स्थानांची झेप घेत ५८व्या क्रमांकावर, तर रिंकू सिंग १३ स्थानांची मुसंडी मारत ६८व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
याशिवाय अफगाणिस्तानचा दरविश रसूली २९ स्थानांची मोठी झेप घेत संयुक्तपणे ८७व्या क्रमांकावर, तर वेस्ट इंडीजचा शिमरॉन हेटमायर २७ स्थानांची प्रगती करत ९३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स १८ स्थानांची झेप घेत ५३१ रेटिंगसह ४४व्या क्रमांकावर आहे.
बुमराह–बिश्नोईच्या क्रमवारीतही सुधारणा
आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान याने वेस्ट इंडीजविरुद्ध २१ धावांत ४ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी करत पाच स्थानांची झेप घेत ९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह चार स्थानांची प्रगती करत १३व्या क्रमांकावर, तर रवी बिश्नोई १३ स्थानांची झेप घेत १९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश आठ स्थानांची प्रगती करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ३२व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्याची चांदी
टी २० मध्ये ऑलराउंडर्स क्रमवारीत झिम्बाब्वेचा सिकंदर रजा (२८९ रेटिंग) अव्वल स्थानावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा सॅम अयूब (२७७ रेटिंग), तर हार्दिक पांड्या (२४८ रेटिंग) एका स्थानाची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हार्दिक तिसऱ्या स्थानावर पोहोचल्यामुळे वेस्ट इंडीजचा रोस्टन चेस एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर गेला आहे. भारतीय संघाचा शिवम दुबे सहा स्थानांची प्रगती करत अफगाणिस्तानच्या राशिद खानसोबत संयुक्तपणे ११व्या क्रमांकावर आहे. तर अक्षर पटेल तीन स्थानांनी घसरत १४व्या क्रमांकावर आहे.