Rohit Sharma Virat Kohli, ICC ODI Rankings : भारतीय संघाने न्यूझीलंडला फायनलमध्ये पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. सामन्यात न्यूझीलंडने ( New Zealand ) डॅरेल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (७६), श्रेयस अय्यर (४८) आणि केएल राहुल (नाबाद ३४) या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत या तिघांव्यतिरिक्त विराट कोहली आणि शुबमन गिल ( Shubman Gill ) यांनीही दमदार कामगिरी केली. त्यामुळेच ICCने जारी केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला दिसून येत आहे.
रोहितने केलं विराटला 'ओव्हरटेक'
रोहित शर्माने फायनलच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८३ चेंडूत ७६ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर ताज्या क्रमवारीत रोहितला दोन स्थानांची बढती मिळाली आणि तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. त्याने विराट कोहलीला मागे टाकले. विराट आणि आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन या दोघांची एक-एक स्थानाने घसरण झाली. ताज्या क्रमवारीत, शुबमन गिल ७८४ गुणांसह अव्वल, बाबर आझम ७७० दुसऱ्या स्थानी, रोहित शर्मा ७५६ गुणांसह तिसऱ्या स्थानी, हेनरिक क्लासेन ७४४ गुणांसह चौथ्या तर विराट कोहली ७३६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. टॉप १० मध्ये आठव्या स्थानीही ७०४ गुणांसह श्रेयस अय्यर विराजमान आहे.
गोलंदाजीत कुलदीप, सँटनर, जाडेजा चमकले
गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव ३ स्थानांची बढती घेऊन ६५० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर यानेही मोठी झेप घेतली आहे. त्याला ६ स्थानांची बढती मिळाली आहे. तो ६५७ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. टॉप १०मध्ये भारताचा रविंद्र जाडेजा १०व्या स्थानी आहे. त्यानेही ३ स्थानांची बढती घेतली आहे. तो ६१६ गुणांसह त्यास्थानी आहे. वरूण चक्रवर्तीनेही १६ स्थानांची मोठी उडी घेत ४०२ गुणांसह ८०व्या स्थानी ठाण मांडले आहे.