इंग्लंड-न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात फलंदाजांच्या गटात मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट फलंदाजांच्या क्रमवारीत अजूनही अव्वलस्थानी असला तरी त्याच्या संघातील सहकारी हॅरी ब्रूक त्याला आव्हान देताना दिसते. दुसरीकडे भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालसह किंग कोहली आणि शुबमन गिल यांच्या क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसते.
हॅरी ब्रूकच्या प्रगतीचा यशस्वीला बसला फटका, जो रुटचं अव्वलस्थानही धोक्यात
इंग्लंडचा फलंदाज जो रूट ८९५ रेटिंगसह फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ हॅरी ब्रूक ८५४ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. हॅरी ब्रूक यानं न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७१ धावांची दमदार खेळी केली होती. त्याचा त्याला मोठा फायदा झाला आहे. दुसरीकडे जो रुट या सामन्यात अपयशी ठरला होता. ब्रूकच्या कामगिरीचा परिणाम यशश्वी जैस्वालचा क्रमवारीत घसरण झाली आहे. भारतीय सलामीवीर नव्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. यशस्वीच्या आधी केन विलियम्सन तिसऱ्या स्थानावर आहे.
किंग कोहलीसह शुबमन गिल घाट्यात
भारतीय स्टार बॅटर विराट कोहलीचीही नव्या क्रमवारीत एका स्थानांनी घसरण झाली आहे. ६८९ रेटिंग पॉइंट्ससह तो १४ व्या स्थानावर आहे. भारतीय विकेट किपर बॅटर सहाव्या स्थानावर कायम असून पर्थ कसोटीला मुकलेल्या शुबमन गिलचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. तो सध्या १८ व्या क्रमांकावर आहे.
यशस्वीला मोठा डाव साधण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत होणारा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून अॅडिलेडच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यात दमदार कामगिरीसह यशस्वीसह विराट कोहली आणि शुबमन गिल क्रमवारीत आगेकूच करू शकतात. यशस्वी जैस्वाल याने पर्थ कसोटी सामन्यात दमदार खेळी साकारली होती. मालिकेतील उर्वरित सामन्यात तो याच तोऱ्यात खेळला तर त्याला मोठा फायदा होऊ शकतो.