वॉशिंग्टन: विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यानं सगळीकडेच क्रिकेट फिव्हर पाहायला मिळतो आहे. कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, अंतिम सामन्यात कोण भिडणार, विश्वचषक कोण जिंकणार, याबद्दल प्रत्येकानं अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीदेखील अंतिम सामन्याबद्दल भाकीत केलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
भारत आणि इंग्लंडमध्येविश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होईल, असा अंदाज पिचाईंनी वर्तवला. इंग्लंडमध्ये खेळणारा भारतीय संघ उत्तम कामगिरी करत असल्याचं सुंदर पिचाईंनी म्हटलं. त्यांनी विराटसेनेला शुभेच्छादेखील दिल्या. यूएसबीआयसीनं पिचाईंचा ग्लोबल लीडरशिप सन्मानानं गौरव केला. त्यावेळी यूएसबीआयसीच्या अध्यक्षा निशा देसाईंनी काही प्रश्न विचारले. त्यात विश्वचषक स्पर्धेशी संबंधित प्रश्नांचाही समावेश होता.
आपल्याला क्रिकेट आणि बेसबॉल आवडत असल्याचं पिचाईंनी सांगितलं. यंदा भारतानं विश्वचषक जिंकावं अशी मनोमन इच्छा असल्याचं ते म्हणाले. यंदा कोणते संघ अंतिम सामना खेळतील, असं विचारताच त्यांनी भारत आणि इंग्लंड असं उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियन संघाची स्पर्धेतील कामगिरी चांगली असेल, असंदेखील ते म्हणाले. सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास इंग्लंड आणि भारताचे प्रत्येकी 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट उत्तम असल्यानं इंग्लंड भारतापेक्षा पुढे आहे. इंग्लंडनं 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर भारतानं 2 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.