How can India make it to the finals? Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. पण, युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) तीन विकेट्स घेत भारताच्या आशा पल्लवीत केल्या. त्यात आर अश्विननेही १ विकेट्सची भर टाकली. बिनबाद ९७ वरून श्रीलंकेची अवस्था ४ बाद १११ धावा अशी झाली होती. पण, श्रीलंकेचं नशीब आज जोरात होतं. २ चेंडूंत २ धावा हव्या असताना रिषभ पंत व अर्शदीप सिंग यांच्याकडून रन आऊटची संधी हुकली अन् श्रीलंकेने बाजी मारली.
![]()
भारताकडून रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने ३४ धावा केल्या. हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कुसल मेंडिस ( ५७) व पथूम निसंका ( ५२) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी ३४ चेंडूंत नाबाद ६४ धावा करून ६ विकेट्स राखून विजय मिळवला. शनाका १८ चेंडूंत ३३ धावांवर, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला.
![]()
भारतीय संघ कसा जाईल फायनलमध्ये?
श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. पाकिस्तानच्या खात्यात १ विजय आहे आणि त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. पाकिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्याशी खेळायचे आहे. यापैकी एक सामना जिंकल्यास पाकिस्तान अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान- श्रीलंका यांच्यात जेतेपदाची लढत होईल.
![]()
पण, भारताला अजूनही एक संधी आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने गमावल्यास आणि भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास, सुपर ४ मधील उर्वरित तीन संघांचे प्रत्येकी एक विजय होतील. अशात ज्याचा नेट रन रेट चांगला असेल तो संघ अंतिम फेरीत जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा नेट रन रेट ०.१२६ असा, तर अफगाणिस्तानचा -०.५८९ असा आहे. भारताचा नेट रन रेट -०.१२५ झाला आहे.