BCCI's central contract list for India Women Cricketers : बीसीसीआयने २०२४-२५ च्या हंगामासाठी भारतीय महिला संघातील केंद्रीय करारबद्ध महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी कर्णधार हरमनप्रीत कौर, उप कर्णधार स्मृती मानधना आणि ऑलराउंडर दीप्ती शर्मा या तिघींची नावे सर्वोच्च 'अ' श्रेणीत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ महिला खेळाडूंची तीन गटात विभागणी
बीसीसीआयने १६ खेळाडूंची यादी तयार केली आहे. वरिष्ठ क्रिकेट संघातील खेळाडूंच्या कामगिरीनुसार या महिला खेळाडूंनी तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या स्टार महिला खेळाडूंशिवाय रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शफाली वर्मा यांना 'ब' श्रेणीत स्थान मिळाले आहे. तर यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि तीतास साधू यांना 'क' श्रेणीसह करारबद्ध करण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक करारातून या स्टार महिला खेळाडूंचा पत्ता झाला कट
बीसीसीआयने नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवताना काही प्रसिद्ध चेहऱ्यांना पत्ता कट केल्याचे दिसते. यात राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग आणि हरलीन देओल सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी महिन्यात २७ एप्रिल २०२५ पासून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या महिला विश्वचषक २०२५ च्या दृष्टीने बीसीसीआयने संघ बांधणी केल्याचे दिसते.
कोणत्या गटातील खेळाडूला किती पॅकेज मिळते?
- 'अ' श्रेणीतील महिला क्रिकेटर: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा (मॅच फी शिवाय या गटातील महिला खेळाडूंचे वार्षिक पॅकेज ५० लाख रुपये इतके आहे.)
- 'ब' श्रेणीतील महिला क्रिकेटर : रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, शफाली वर्मा (मॅच फी शिवाय या गटातील महिला खेळाडूंचे वार्षिक पॅकेज ३० लाख रुपये इतके आहे.)
- 'क' श्रेणीतील महिला क्रिकेटर : यास्तिका भाटिया, राधा यादव, श्रेयंका पाटील, तितास साधू , अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा, पूजा वस्त्रकार (मॅच फी शिवाय या गटातील महिला खेळाडूंचे वार्षिक पॅकेज १० लाख रुपये इतके आहे.)