महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघानं कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्ससमोर १५० धावांचे टार्गेट सेट केले आहे. यश्तिका भाटिया ८ (१४) आणि हेली मॅथ्यू ३ (१०) स्वस्तात माघारी परतल्यावर हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट या दोघींनी ८९ धावांची भागीदारी रचली. या दोघींची भागीदारी सोडली तर अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही.
जोडी फुटली अन् दिल्लीच्या संघानं मुंबईला बॅकफूटवर ढकलले
नॅटली सायव्हर ही २८ चेंडूत ३० धावा करून तंबूत फिरल्यावर हरमनप्रीत कौर एकटी पडली. तिने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. पण अखेरच्या टप्प्यात अन्य बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी निर्धारित २० षटकात मुंबई इंडियन्सचा डाव ७ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १४९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पहिली ट्रॉफी उंचावण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आता १५० धावा करायच्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजांनी आपली जबाबदारी पाडली पार, आता बॅटरचा नंबर
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून मेरिझॅन कॅप, जेस जोनासन नल्लपुरेड्डी चराणी या तिघींनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय ॲनाबेल सदरलँड हिच्या खात्यात एक विकेट जमा झाली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रत्येक हंगामात फायनल खेळला आहे. पण अद्याप त्यांनी पहिली ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तिसऱ्या प्रयत्नात गोलंदाजांनी आपलं काम उत्तमरित्या बजावल्यावर आता दिल्ली संघातील बॅटरवर पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा संपवण्याची जबाबदारी पडली आहे. ते हा डाव साधणार की, मुंबई इंडियन्सचा संघ त्यांना रोखून नवा इतिहास रचणार ते बघण्याजोगे असेल. वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभूत करतच मुंबई इंडियन्स यांच्यानं पहिली ट्रॉफी जिंकली होती. पण आता दुसऱ्यांदा ती कामगिरी करायची असेल तर गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल.