Join us

कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी

WPL च्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:14 IST

Open in App

WPL 2025 : महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. तिसऱ्या हंगामातील १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात लढत पाहायला मिळाली. कॅप्टन हरमनप्रीतच्या दमदार आणि विक्रमी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं हा सामना जिंकत थेट फायनल खेळण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.  या सामन्यात हरमनप्रीत कौरनं ३३ चेंडूत केलेल्या ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरात विरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळीसह हरमनप्रीत कौरच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये. WPL च्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्स कॅप्टन हरमनप्रीत कौरची विक्रमी कामगिरी

हरमनप्रीत कौरनं गुजरात विरुद्धच्या लढतीत आतापर्यंत ७८.७५ च्या सरासरीसह १७१.२ च्या स्ट्राइक रेटनं ३१५ धावा केल्या आहेत. महिला प्रीमियर लीग स्पर्धेत कोणत्याही खेळाडूनं एका संघाविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या संघाविरुद्ध ६ सामने खेळताना तिच्या भात्यातून ४ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. या यादीत नॅटली सायव्हर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

WPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या बॅटर्सची यादी

  • ३१५ - हरमनप्रीत कौर विरुद्ध गुजरात जाएंट्स
  • २९८ - नॅटली सायव्हर-ब्रंट विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • २९४ - मेग लेनिंग विरुद्ध यूपी वॉरियर्स
  • २८१ - शफाली वर्मा विरुद्ध आरसीबी
  • २७३ - एलिस पेरी विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २६९  - मेग लेनिंग विरुद्ध मुंबई इंडियन्स 

हरमनप्रीतनं नॅटली अन् शफालीचा विक्रमही मोडला

गुजरात जाएंट्स विरुद्धच्या लढतीत हरमनप्रीत कौरनं या लीगमध्ये सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा नॅटली आणि शफालीचा विक्रमही मोडीत काढला. तिने सातव्यांदा फिफ्टी प्लस धावसंख्या केलीये. नॅटली आणि शफाली वर्मा या दोघींनी आतापर्यंत प्रत्येकी ६-६ वेळा ही कामगिरी केली आहे.

 WPL मध्ये  सर्वाधिक ५० + धावा करणाऱ्या बॅटर्स

  • ९ – मेग लेनिंग (दिल्ली कॅपिटल्स)
  • ८ – एलिस पेरी (आरसीबी)
  • ७ – हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • ६ – नॅटली सायव्हर ब्रंट (मुंबई इंडियन्स)
  • ६ – शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)

मुंबई इंडियन्सचा संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. जर हा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात १२ गुण जमा होतील अन् ते यंदाच्या हंगामात गुणतालिकेत टॉपर ठरत  डायरेक्ट १४ मार्चला रंगणाऱ्या फायनलमध्ये पोहचतील. जर हा सामना गमावला तर त्यांना पुन्हा एलिमिनेटरमध्ये गुजरात विरुद्ध सामना खेळावा लागेल. 

टॅग्स :हरनमप्रीत कौरमुंबई इंडियन्समहिला प्रीमिअर लीग