Join us

जय हिंद... गौतम गंभीरचा राजकारणातून संन्यास; वरिष्ठांना सांगितली पुढील दिशा

राजकारणातून सन्यास घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्याच अनुषंगाने गंभीरने पक्षाच्या वरिष्ठांकडे मागणीही केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 10:37 IST

Open in App

देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुढील काही दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीने बैठक घेऊन १०० ते १२० उमेदवारांची यादी निश्चित केल्याचं समजते. त्यात, यंदा दिल्लीतून क्रिकेटर गौतम गंभीर आणि पंजाबमधून सनी देओलला संधी देण्यात येणार नसल्याची चर्चा होती. त्यातच, आता गौतम गंभीरने ट्विट करुन राजकारणातून संन्यास घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्याच अनुषंगाने गंभीरने पक्षाच्या वरिष्ठांकडे मागणीही केली.

गौतम गंभीरने ट्विट करुन माहिती दिली, त्यानुसार, मी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे विनंती केली आहे. मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करावे. म्हणजे मी माझ्या पुढील क्रिकेट करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करू शकेल, असे गंभीरने म्हटले आहे. तसेच, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. जय हिंद... असे ट्विट गौतम गंभीरने केले आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत गौतम गंभीर उमेदवार नसणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. दरम्यान, गौतम गंभीरऐवजी दिल्लीतून अक्षय कुमारला भाजपाकडून संधी देण्यात येणार आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.   

टॅग्स :गौतम गंभीरराजकारणभाजपाअमित शाहनिवडणूक