Gautam Gambhir Team India IND vs SA 2nd Test: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर सध्या टीकेचा धनी ठरताना दिसतोय. गंभीरच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी२० आणि वनडे मध्ये उत्तम कामगिरी केली. पण कसोटी क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी सातत्याने खालावत चालली आहे. गंभीरच्या आगमनानंतर, गेल्या १२-१३ महिन्यांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर चार कसोटी सामने गमावले. भारतीय संघ काही वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर अभेद्य होता, पण आता ती स्थिती राहिली नाही. त्याचे एक कारण म्हणजे फलंदाजी क्रमवारीतील नंबर ३च्या स्थानात सतत होणारा बदल. यामुळे भारतीय संघाची अवस्था बिकट होताना दिसत आहे, जे कोलकाता कसोटीतही दिसून आले.
क्रमांक-३ स्थानावर सतत बदल
कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या बदलाची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दीड वर्षात सुंदर हा भारतीय फलंदाजी क्रमात ३ वर खेळणारा सातवा फलंदाज ठरला आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून किमान सात वेगवेगळ्या फलंदाजांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. गेल्या वर्षी गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तेव्हा शुभमन गिलने ही भूमिका सांभाळली होती. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता.
![]()
या काळात, गिल कर्णधार बनून चौथ्या क्रमांकावर आला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनाही एका सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. मग देवदत्त पडिकलला संधी मिळाली. करुण नायरलाही इंग्लंडमध्ये एकदा ही संधी देण्यात आली. नंतर सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले गेले आणि आफ्रिकेविरुद्ध त्याला अचानक पुन्हा या भूमिकेतून काढून टाकण्यात आले. आता वॉशिंग्टन सुंदरला या स्थानावर खेळवले जात आहे.
द्रविड, पुजारा सारख्या स्थैर्याचा अभाव
कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज खूप महत्त्वाचा असतो. हा खेळाडू संघाच्या डावाला दिशा देतो. टीम इंडियामध्ये गेल्या २५ वर्षांपासून राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरसोबत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळत होता. या अनुभवी खेळाडूंनंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पण पुजाराला संघातून वगळल्यापासून भारतीय संघाला यावर तोडगा सापडलेला नाही. गंभीरला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा लागेल. अन्यथा यावेळीही भारताला कसोटी चॅम्पियनशीपचे तिकीट मिळणार नाही.