Gautam Gambhir Team India Dressing Room: भारतीय माजी क्रिकेटर गौतम गंभीरला टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. गंभीरची कोचिंग शैली काहीशी कठोर आहे, ज्यामुळे त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये यश मिळाले आहे, परंतु कसोटी क्रिकेटमधील आव्हाने जास्त आहेत. त्याच्या कार्यकाळात, भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण हा सतत चर्चेचा विषय राहिला आहे. तशातच पुन्हा एकदा भारतीय ड्रेसिंग रूमबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
टीम इंडियाचे खेळाडू भीतीच्या वातावरणात?
भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सध्या एक वेगळेच वातावरण आहे . पीटीआयच्या वृत्तानुसार , गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये त्यांच्या संघातील स्थानाबद्दल अधिकाधिक असुरक्षित वातावरण वाटू लागले आहे. हे राहुल द्रविडच्या कार्यकाळात कधीच दिसून आले नव्हते. द्रविडच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात, खेळाडूंच्या भूमिका स्पष्ट होत्या आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्याच्या अधिक संधी मिळाल्या होत्या. आता मात्र परिस्थिती बदलली आहे आणि अनेक खेळाडूंना अनेक कारणांमुळे त्यांच्या स्थानाबद्दल चिंता आहे.
गौतम गंभीरचे प्रयोग
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली रोहित शर्माकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेणे हा एक महत्त्वाचा निर्णय होता. संघातील बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला. गंभीरचा असा विश्वास आहे की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजीची स्थाने निश्चित केली जाऊ नयेत. सलामी जोडी वगळता इतरांना कुठेही खेळता आले पाहिजे. त्यामुळे संघात लवचिकता वाढते. पण गंभीरच्या या प्रयोगांमुळे खेळाडूंच्या मनात अनिश्चितता देखील वाढताना दिसत आहे. संघ संयोजनाच्या नावाखाली प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे गंभीरच्या काळात सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंमध्ये कायम कामगिरीबाबत तणाव आणि संघातून वगळले जाण्याची भीती असते असे सांगण्यात आहे.