पाथरी : मराठवाड्यातून अनेक उत्तम क्रिकेटपटू तयार होत आहेत; परंतु, स्वतंत्र रणजी संघ नसल्याने दर्जेदार खेळाडूंना संधी मिळत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघाची गरज असून ही मागणी खा. शरद पवार यांच्याकडे लावून धरणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे बोलताना सांगितले.
पाथरी येथे पाथरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाबाजानी दुर्राणी होते. यावेळी मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई, विदर्भ, महाराष्ट्र असे रणजी संघ आहेत. मात्र मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ नाही. मराठवाड्याकरिता स्वतंत्र रणजी संघाची गरज आहे. या करीता खा. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी लावून धरणार आहे.
क्रिकेटच्या मैदानातूनच राजकारणात एंट्री
यावेळी मुंडे यांनी आपल्या क्रिकेट प्रेमाचे किस्से सांगितले. माझे काका दिवंगत गोपीनाथराव मुंडे होते तेव्हा १९९६ पासून आजपर्यंत परळीमध्ये आम्ही क्रिकेट स्पर्धा कायम घेत आहोत़ मी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होतो, असं मला वाटतंय. त्याच क्रिकेटच्या मैदानातूनच आपण राजकीय मैदानात एंट्री केली, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही क्रिकेटची खूप आवड आहे़ सुईपासून जेट विमानापर्यंतची इत्यंभूत माहिती असलेले शरद पवार हे देशातील एकमेव व्यक्ती आहेत. बीसीसीआयने देशपातळीवर जे आज चांगल्या प्रकारे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करीत आहे, त्याचे सर्व श्रेय शरद पवार यांनाच आहे, असेही यावेळी ते म्हणाले़ त्यांनी मराठीबरोबरच हिंदीतून ही भाषण करून उपस्थित क्रिकेटप्रेमींची मने जिंकली़ तसेच राजकारणात आपला संघर्ष सुरू असून, तो कायम राहील, आपण डगमगणार नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.