Join us

माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या कारला भीषण अपघात, ट्रकने दिली धडक, मुलगाही होता सोबत

Pravin Kumar Car Accident: भारताचा माजी गोलंदाज असलेला प्रवीण कुमार याच्या कारला मंगळवारी रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिली. त्यावेळी प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 11:42 IST

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार एका भीषण कार अपघातात बालंबाल बचावला. एकेकाळचा अव्वल गोलंदाज असलेला प्रवीण कुमार याच्या कारला मंगळवारी रात्री कमिश्नर आवासाजवळ एका भरधाव ट्रकने धडक दिली. त्यावेळी प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते. सुदैवाने या दोघांनाही कुठलीही इजा झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे.

प्रवीण कुमार हा मेरठमधील बागपत रोडवरील मुलतान नगर येथे राहतो. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास प्रवीण कुमार हा त्याच्या डिफेंडर गाडीमधून पांडवनगरच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत त्याचा मुलगाही होता. दरम्यान, कमिश्नर आवासाजवळ समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने प्रवीण कुमारच्या कारला टक्कर दिली.

या अपघातात प्रवीण कुमारच्या कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सुदैवाने प्रवीण कुमार आणि त्याच्या मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. अपघाताची वार्ता कळताच घटनास्थळावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यांनी ट्रकचालकाला पकडले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. 

टॅग्स :उत्तर प्रदेशअपघातभारतीय क्रिकेट संघ
Open in App