भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या त्याच्या खेळाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही सातत्याने चर्चेत असतो. तो सध्या माहिका शर्माला डेट करत असून ती विश्वचषकादरम्यान भारतीय संघासोबतही दिसली होती. हार्दिकने आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली असली तरी, तो त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक आणि मुलगा अगस्त्य यांची पूर्ण काळजी घेत असल्याचे दिसते. त्याने नुकतीच नताशा आणि अगस्त्यला ४ कोटी रुपयांची आलिशान एसयूव्ही गिफ्ट म्हणून दिली आहे
स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्याने नताशा स्टॅनकोविक आणि अगस्त्यला काळ्या रंगाची 'लँड रोव्हर डिफेंडर' कार गिफ्ट केली आहे. या एसयूव्हीची किंमत साधारणपणे ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत जाते. ही कार घेण्यासाठी नताशा स्वतः अगस्त्यसोबत शोरूममध्ये पोहोचली होती. याचे फोटोही सोशल मीडियावर सोमर आले आहेत.
ही कार हार्दिक पंड्यानेच भेट दिल्याची पुष्टी खुद्द कार उत्पादक कंपनीनेच केली आहे. याचा फोटो शेअर करत त्यांनी, 'हार्दिक पंड्याने कार खरेदी केली असून ती अगस्त्य पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांना भेट केली असल्याचे, कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक वेगळे झाले असले तरी, ते ज्या पद्धतीने आपल्या मुलगा अगस्त्यचे 'को-पेरेंटिंग' करत आहेत, ते अनेकांसाठी आदर्श आहे.
२०२४ मध्ये झाले विभक्त -
हार्दिक आणि नताशा यांचे लग्न २०२० मध्ये झाले होते. त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांना अगस्त्य झाला. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच २०२४ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.