ENG vs AUS Ashes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात मिचेल स्टार्कनं पहिल्या डावातील ७ विकेट्स घेतल्यावर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेत १० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. दुसऱ्या डावातही त्याने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राउली याला खाते न उघडता तंबूत धाडले. या विकेटसह अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन डावात संघाचे खाते उघडण्याआधी पहिली विकेट पडल्याचे पाहायला मिळाले. यात भर पडली ती स्टार्कनं स्वत:च्या गोलंदाजीवर घेतलेल्या अफलातून झेलची.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल स्टार्कचा अफलातून झेल!
३५ वर्षीय मिचेल स्टार्क गोलंदाजीच्या वेगानं युवा गोलंदाजांनाही मागे पाडतो. पण यावेळी त्याने क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत क्रिकेट जगताला थक्क करून सोडले. पहिल्या डावात इंग्लंडच्या सलामीवीराला सहाव्या चेंडूवर बाद करणाऱ्या स्टार्कनं दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर झॅक क्राउलला तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी कमालीचा झेल टिपला. चेंडू फेकल्यावर वेगाने येणारा चेंडू पकडण्यासाठी स्टार्कनं डाव्या बाजूला उडी मारून अशक्यप्राय वाटणारा झेल एका हातात पकडला.
स्टार्कशी तुलना करत लोकेश राहुल झाला ट्रोल, कारण...
सोशल मीडियावर मिचेल स्टार्कचा कॅच चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या कॅचनंतर नेटकऱ्यांनी भारताचा अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात लोकेश राहुल याने बुमराहच्या गोलंदाजीवर मार्करमचा एक सोपा झेल सोडला होता. ३३ वर्षीय लोकेश राहुलपेक्षा ३५ वर्षीय स्टार्क भारी ठरला, अशी तुलना करत सोशल मीडियावर लोकेश राहुल ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले.
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
कसोटीत पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे स्टार्क
मिचेल स्टार्क याने इंग्लंडविरुद्धच्या पर्थ कसोटीत दोन्ही डावात झॅक क्राउलीला पहिल्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. कसोटीत पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क अव्वलस्थानी आहे. पदार्पणापासून आतापर्यंत त्याने पहिल्या षटकात २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत जेम्स अँडरसनचा नंबर लागतो. अँडरसन याने आपल्या कारकिर्दीत पहिल्या षटकात १९ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.