नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) हे सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रिय असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून एक मोठी घोषणा केली आहे. त्यांचा ट्विटर करार रद्द झाल्यानंतर ते फुटबॉलचा संघ खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते लवकरच लोकप्रिय फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडची (Manchester United Club) खरेदी करणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) देखील याच क्लबकडून खेळतो. त्यांनी केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. काही लोक याची खिल्ली उडवत आहेत तर काहींनी मस्क यांचे अभिनंदन केले आहे.
मस्क यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधान
दरम्यान, इलॉन मस्क नेहमीच त्यांच्या मजेशीर ट्विटमुळे चर्चेत असतात. त्यांनी फुटबॉल क्लब खरेदी करण्यापूर्वी राजकारणाबाबत एक भन्नाट ट्विट केले होते. मी आता रिपब्लिकन पार्टीला पाठिंबा देत आहे आणि निम्मा पाठिंबा डेमोक्रेटिकला देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा ट्विट करत म्हटले, "मी आता मॅनचेस्टर युनायटेडची खरेदी करत आहे", त्यामुळे सोशल मीडियावर या ट्विटची खूप चर्चा रंगली आहे.
मस्क यांच्या ट्विटला युजर्संनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी हे सर्व खोटे असल्याचे म्हणून ट्विटची खिल्ली उडवली आहे तर काही जण त्यांचे अभिनंदन करत आहेत. इलॉन मस्कने अलीकडेच सोशल मीडिया साइट ट्विटरशी देखील करार तोडला आहे. याआधी त्यांनी ट्विटरसोबत मोठी डील केली होती. मात्र, नंतर ते या करारातून बाहेर पडले असून त्यांच्यावर खटला देखील दाखल करण्यात आला आहे.