Join us

'जखमी वाघ' Ruturaj Gaikwad फिफ्टीच्या उंबरठ्यावर; भारत 'क' संघाची नजर ४०० पारवर

दुसऱ्या दिवशी कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 18:51 IST

Open in App

दुलिप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या सामन्यातील पहिला दिवस ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' संघानं गाजवला. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर भारत 'क' संघाचा कर्णधार ऋतुराजला फक्त दोन चेंडू खेळून तंबूत परतण्याची वेळ आली होती. पण डावाची सुरुवात करणारा कॅप्टन पुन्हा मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाहीतर दिवसाअखेरीस क्रीजवर उभा राहत त्याने संघाला आणखी मजबूत स्थितीत घेऊन जाण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड यानं २ चेंडूत ४ धावा करत रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला होता. पण या किरकोळ दुखापतीतून सावरत तो पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधीच मैदानात उतरला. ५० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने त्याने ४६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी कॅप्टन ऋतुराजच्या  नजरा या अर्धशतकावर असतील. 

भारत 'क' मजबूत स्थितीत, आता संघाच्या नजरा ४०० पारवर

भारत 'ब' विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या भारत 'क' संघाने पहिल्या दिवसाअखेर धावफलकावर ५ बाद ३५७ धावा लावल्या होत्या. या संघाकडून साई सुदर्शन ४३ (७५), रजत पाटीदार ४० (६७), इशान किशन १११(१२६), बाबा इंद्रजीत ७८(१३६) आणि अभिषेक पोरेल याने संघासाठी १४ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. 

इशान किशनचं शानदार शतक, बाबानं दाखवले तेवर

भारतीय संघात कमबॅकसाठी धडपडणाऱ्या इशान किशन याने शतकी तोऱ्यासह लक्षवेधून घेतलं. दुलिप करंडक स्पर्धेत त्याच्या भात्यातून आलेले हे पहिले वहिले शतक आहे. त्याच्याशिवाय बाबा इंद्रजीत याने आपल्या खेळीनं प्रभावित केले. दुसऱ्या दिवशी कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. तो संघाची धावसंख्या कुठेपर्यंत घेऊन जातो ते पाहण्याजोगे असेल.

दोन्ही संघात तगडी फाइट, कारण...

दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत 'क' संघाने भारत 'ड' संघाविरुद्ध विजय नोंदवला होता. दुसरीकडे भारत 'ब' संघानं देखील पहिला सामना जिंकला होता. त्यांनी भारत 'अ' संघाला पराभवाचा दणका दिला होता. त्यामुळे या सामन्यातील विजेता स्पर्धेत ट्रॉफीच्या आणखी जवळ जाईल.

टॅग्स :ऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ