Join us

Duleep Trophy 2024 : विकेटमागे ध्रुव जुरेलची कमाल; हवेत उडी मारुन पकडला अफलातून कॅच

विकेट मागे ध्रुव जुरेल याने दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय ठरतीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:55 IST

Open in App

Duleep Trophy 2024 Dhruv Jurel's Brilliant Diving Catch : देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण आणि अनेक स्टार क्रिकेटर्सचे भविष्य ठरवणाऱ्या दुलिप करंडक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. इंडिया ए आणि इंडिया बी यांच्यातील सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. 

शुबमन गिलनं टॉस जिंकून घेतला बॉलिंग करण्याचा निर्णय

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील ए संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंडिया बी संघ पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरला. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करतोय. यशस्वी जयस्वालच्या साथीनं कॅप्टन अभिमन्यू यानेच इंडिया बी संघाच्या डावाला सुरुवात केली. या जोडी अगदी संयमीरित्या डाव पुढे नेताना दिसली. पण अवघ्या ३३ धावांवर आवेश खाननं इंडिया बी संघाला पहिला धक्का दिला.

 ध्रुव जुरेलची कमाल, सर्वोत्तम कॅचसह वेधलं लक्ष

 

इंडिया अ संघाकडून खेळणाऱ्या आवेश खान याने प्रतिस्पर्धी संघातील कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन याला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने ४२ चेंडू खेळून संघाच्या धावंसख्येत फक्त  १३ धावांची भर घातली. अभिमन्यू  ईश्वरन याची विकेट आवेश खानच्या खात्यात जमा झाली असली तरी विकेट मागे ध्रुव जुरेल याने दाखवलेली चपळाई चर्चेचा विषय ठरतीये. त्याने हवेत उडी मारून कमालीचा कॅच पकडला. हा कॅच सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे.  ध्रुव जुरेल हा एक प्रतिभावंत क्रिकेटर आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या या विकेट किपर बॅटरनं भारतीय संघाकडून ३ कसोटी सामन्यासह दोन टी-२० सामनेही खेळले आहेत.  

सरफराजसह पंतवर असतील नजरा

इंडिया बीच्या कॅप्टननं तंबूचा रस्ता धरल्यावर यशस्वी जयस्वालही चालता झाला. खलील अहमदनं यशस्वीच्या रुपात इंडिया बी संघाला दुसरा धक्का दिला. लंचआधीच इंडिया बी संघाची  सलामी जोडी तंबूत परतली होती. इंडिया बी मध्ये सरफराज खानशिवाय रिषभ पंतवरही सर्वांच्या नजरा असतील. कारण अपघातातून सावरल्यानंतर पहिल्यांदाच तो रेड बॉल क्रिकेट खेळताना दिसणार आहे.     

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयशुभमन गिलरिषभ पंत