नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात वेगवान गोलंदाज श्रीसंतसह अनेक खेळाडूंना आरोपातून मुक्त करण्याचा कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपीलाबाबत जुलैच्या अखेरपर्यंत निर्णय व्हावा, असे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला म्हटले आहे.
श्रीसंतने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे. या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने योग्य ठरविले होते. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, क्रिकेटपटूची क्रिकेट खेळण्याची उत्सुकता आम्ही समजतो, पण कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात दिल्ली पोलीसने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.’ (वृत्तसंस्था)