Ayush Mhatre Century : अंडर १९ आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळताच आयुष म्हात्रेनं मुंबई वरिष्ठ संघाकडून शतकी धमाका केला आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विदर्भ संघाविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करताना ४९ धावांत शतक साजरे केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर १९३ धावांचे लक्ष्य १३ चेंडू आणि ७ गडी राखून पार केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजिंक्य रहाणेसह हार्दिकच्या रुपात मुंबईच्या संघाला धक्क्यावर धक्का
विदर्भ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १९२ धावा करत मुंबईच्या संघासमोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना १८ वर्षीय आयुष म्हात्रे याने अनुभवी अजिंक्य रहाणेच्या साथीनं मुंबई संघाच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे खातेही न उघडता माघारी फिरला. त्याच्या पाठोपाठ हार्दिक तामोरेही स्वस्तात बाद झाला.
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
आयुष म्हात्रेनं आधी सूर्या दादा अन् मग शिवमच्या साथीनं सेट केली मॅच
आयुष म्हात्रे आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत ८८ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादव ३५ धावा करून परतल्यावर आयुष म्हात्रे याने शिवम दुबेच्या साथीनं ३५ चेंडूत ८५ धावांची भागीदारी रचत संघाला अगदी सहज विजय मिळवून दिला. आयुष म्हात्रे ५३ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने २०७.५५ च्यास्ट्राइक रेटनं ११० धावांची नाबाद खेळी साकारली.
आयुष म्हात्रेची तुफान खेळी सूर्या दादालाही भावली ![]()
IPL च्या गत हंगामात आयुष म्हात्रे CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. संधी मिळालेल्या मोजक्या सामन्यात त्याने आपल्यातील बॅटिंगमधील क्षमता दाखवून दिली. त्यानंतर त्याला इंडिया 'अ' संघाकडूनही संधी मिळाली. आगामी अंडर १९ आशिया कप स्पर्धेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. BCCI नं त्याच्याकडे कर्णधारपद सोपवताच त्याच्या भात्यातून कडक सेंच्युरी आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय टी-२० संघाचा कर्णधारही या युवा बॅटरच्या खेळीनं प्रभावित झाला आहे. इन्टास्टोरीच्या माध्यमातून आयुष म्हात्रेसोबतचा फोटो शेअर करत सूर्या दादानं युवा बॅटरची पाठ थोपटली आहे.