चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला एकतर्फी मात दिली. या सामन्यात शतकी खेळीसह विराट कोहलीने ब्लॉकबस्टर शो दाखवला. भारतीय संघाच्या पाक विरुद्धच्या विराट विजयानंतर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका बाजूला भारतीय संघासह किंग कोहलीच्या खेळीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसऱ्या बाजूला महाकुंभ मेळ्यात प्रकाशझोतात आलेला चेहरा जो आयआयटी वाले बाबा म्हणून ओळखला जातो त्याच्यावर तोंडावर आपटण्याची वेळ आली. भारतीय संघाच्या विजयानंतर नेटकरी त्याला तुफान ट्रोल करत आहेत. त्यानं स्वत: माफीही मागितल्याचे दिसते. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण अन् कोण आहे हा आयआयटी बाबा? यासंदर्भातील सविस्तर माहिती
विराट अँण्ड कंपनीनं कितीही जोर लावला तरी ते जिंकणार नाहीत, .... ती भविष्यवाणी ठरली खोटी
भारत पाक सामन्याआधी या आयआयटी बाबानं भारत-पाक सामन्यासंदर्भात भविष्यवाणी केली होती. विराटसह टीममधील सर्वांनी कितीही जोर लावला तरी दुबईच्या मैदानातील सामन्यात भारतीय संघ जिंकणार नाही, असे त्याने म्हटले होते. मात्र त्याची ही भविष्यवाणी खोटी ठरलीये. भारतीय संघानं दिमाखात दुबईचं मैदान मारलं आहे. एवढेच नाही तर भविष्यवाणी करताना त्याने ज्या कोहलीच्या नावावर जोर दिला त्या कोहलीनंच पाकिस्तानची धुलाई केली. कोहलीच्या भात्यातून नाबाद शतकी खेळी आली. भारतीय संघाच्या दिमाखदार विजयानंतर आयआयटी वाल्या बाबाला नेटकरी ट्रोल करत आहेत. या बाबानं सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीही मागितल्याचे दिसून येते.
कोहली रॉक्ड, आयआयटी बाबा शॉक्ड
भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर आता IIT वाले बाबा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. सोशल मीडियावर मीम्स आणि वेगवेगळ्या कमेंट्स करत अनेकजण या बाबाला ट्रोल करत आहेत. एका वापरकर्त्यानं कोहली रॉक्ड, IIT बाबा शॉक्ड, अशा शब्दांत टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या बाबावर संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे एकाने आता बाबावर अंडरग्राउंड होण्याची वेळ आलीये, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय संघाच्या अपयशाची भविष्यवाणी करणाऱ्या बाबाच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्याचे दिसते.
कोण आहे हा आयआयटी बाबा?
आयआयटी बाबाचे खरं नाव अभय सिंग असं आहे. ज्याने आयआयटी बॉम्बेमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तो एक एयरोस्पेस इंजिनिअर आहे. त्याने कॅनडातील मोठ्या पगाराचा जॉब सोडून अध्यात्माचा मार्ग स्विकारल्याचे बोलले जाते. पण भारतीय संघाविरुद्धच्या भविष्यवाणीमुळे आता तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय.