मीरपूर : धावांसाठी झुंजणाऱ्या भारतीय फलंदाजांना बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मालिका वाचवण्यासाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. मालिका वाचवण्यासाठी संथ खेळपट्टीवर धावा जमविण्याचे आव्हान फलंदाजांना पेलावे लागणार आहे.
फिरकीपटूंनी आतापर्यंत बांगलादेश दौऱ्यात भारतीय फलंदाजांना त्रस्त केले आहे. रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाज मारुफा अख्तरचा सामना करताना अडचणीत सापडले होते. त्यामुळे भारतीय महिलांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही विजय मिळवला. आता बांगलादेशची नजर मालिका विजयावर असेल.
स्मृती मानधना सहाव्या स्थानी, हरमनची घसरण
आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या महिला वन-डे रँकिंगमध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाला फायदा झाला असून, कर्णधार हरमनप्रीतच्या रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे. स्मृती मानधनाला ७०४ रेटिंग पॉइंट्स मिळाले आहेत, तर हरमनप्रीत कौरला ७०२ रेटिंग पॉइंट्स मिळाले आहेत.