भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खांदेपालट पाहायला मिळाली. माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचा अध्यक्षपदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ आज संपला. रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची BCCIच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. गांगुलीने तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे आता नवे खजिनदार आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्या हातात ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी असणार आहे.
Sourav Gangulyकडून अध्यक्षपद घेतलं, महिला IPLला मान्यता दिली; जाणून घ्या BCCIच्या बैठकित नेमकं काय घडलं
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेलार यांना BCCIच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. BCCI च्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करून नव्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
बीसीसीआयची नवीन टीम अध्यक्ष - रॉजर बिन्नी
उपाध्यक्ष - राजीव शुक्ला
सचिव - जय शाह
सरचिटणीस - देवजित सैकिया
खजिनदार - आशिष शेलार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"