आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) खेळाडूंसोबच्या वार्षिक करारासंदर्भातील मोठी घोषणा करेल, हे जवळपास निश्चित आहे. आता नव्या यादीत कोण कोणत्या गटात असणार? विद्यमान कॅप्टन रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचं काय होणार? यासंदर्भात बीसीसीआय काय निर्णय घेणार ते पाहण्याजोगे असेल. भारतीय क्रिकेटरसोबत्या आगामी वार्षिक करारासंदर्भात समोर येणाऱ्या माहितीनुसार, पुढील दोन वर्षांचा विचार करून बीसीसीआय ही यादी तयार करणार आहे. खेळाडूंना करारबद्ध करताना प्रामुख्याने २०२७ मध्ये होणारी वर्ल्ड कप स्पर्धा आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून अंतिम यादी तयार केली जाईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितला अजूनही खेळायचंय, पण...
टाइम्स ऑफ इंडियानं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अजूनही काही काळ खेळण्याची इच्छा आहे. निवृत्ती घ्यायची का नाही तो त्याचा प्रश्न असला तरी टीम इंडियाच्या भविष्यातील योजनेनुसार संघाच्या नेतृत्व बदलासंदर्भात एक वेगळा विचार केला जाऊ शकतो. आतापर्यंत आयसीसी स्पर्धेत रोहित शर्मानं कॅप्टन्सीत छाप सोडली आहे. जर न्यूझीलंड विरुद्धची फायनल मारली अन् भारतीय संघानं त्याच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली तर काय? काय निर्णय होणार तेही पाहण्याजोगे असेल.
रोहितसह कोहलीचं काय? कोणत्या श्रेणीत दिसेल ही जोडी?
बीसीसीआयच्या सध्याच्या वार्षिक करारात, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे चार खेळाडू सर्वोच्च ग्रेड A+ गटात आहेत. टी-२०, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचीच प्रामुख्याने या गटात वर्णी लागते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह रवींद्र जडेजाने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या श्रेणीत नव्या चेहऱ्यांची एन्ट्री पाहायला मिळू शकते. श्रेयस अय्यरचे 'अच्छे दिन' येतील
गत वार्षिक करारातून पत्ता कट झालेल्या श्रेयस अय्यरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने टीम इंडियाच्या फलंदाजीत मीच मध्यफळीतील 'कणा' असल्याचं जणून गाणंच आपल्या दमदार कामगिरीनं वाजवलं आहे. त्यामुळे तो बीसीसीआयच्या वार्षिक करारात पुन्हा दिसेल. एवढेच नाहीतर त्याचा सर्वोच्च श्रेणीतही समावेश केला जाऊ शकतो. त्याच्याशिवाय अक्षर पटेल, लोकेश राहुल आणि रिषभ पंत या मंडळींना बढती देत बीसीसीआय त्यांचा पगार वाढवणार का? ते देखील पाहण्याजोगे असेल.