Why No Standby Player For T20 World Cup 2026 : भारतीय नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी भारतासह श्रीलंकेच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ निवडताना बीसीसीआय निवडकर्त्यांनी काही कठोर निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. यात शुभमन गिलला दाखवलेला बाहेरचा रस्ता आणि दोन वर्षांनी ईशान किशनची टीम इंडियात लागलेली वर्णी या प्रमुख निर्णयांचा समावेश आहे. पण एक गोष्ट सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी आहे ती म्हणजे टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडताना राखीव खेळाडूंची निवड मात्र केलेली नाही. आयसीसी किंवा आशिया कप सारख्या मोठ्या स्पर्धेत संघ निवडी वेळी राखीव खेळाडूंसह संघ निवडला जातो. मग BCCI नं यावेळी राखीव खेळाडूंची निवड का नाही केली? जाणून घेऊयात यासंदर्भातील गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राखीव खेळाडूंशिवाय टीम इंडियाची घोषणा
बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघ बांधणीसाठी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित साकिया यांनी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी देवजित साकिया यांनी राखीव खेळाडूंची निवड न करण्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे.
राखीव खेळाडूंसंदर्भातील मुद्यावर काय म्हणाले बीसीसीआय सचिव?
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलसह रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान हे राखीव खेळाडूच्या रुपात होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीत होते. पण यावेळी भारतीय संघाने राखीव खेळाडूंशिवायच भारतीय संघाची घोषणा केली. यासंदर्भात देवजित साकिया म्हणाले की, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही घरच्या मैदानातच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंची नावे आता जाहीर करण्याची गरज नाही. आयसीसी स्पर्धा जर परदेशात असेल तर त्यांना आयत्या वेळी तिकडे पाठवणे शक्य नसते. त्यामुळे आधीच राखीव खेळाडूसंदर्भात माहिती दिली जाते. आगामी स्पर्धेत गरज पडल्यास त्यावेळी बदली खेळाडूच्या रुपात योग्य तो निर्णय घेतला जाईल.