बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव देवजीत सैकिया आणि सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) चे क्रिकेट प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण उपस्थित होते. या बैठकीनंतर बीसीसीआयने भारत-बांगलादेश यांच्यात वादग्रस्त ठरत असलेल्या मुद्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बैठकीत नेमकं काय घडलं? बांगलादेश क्रिकेट बोर्डानं ICC कडे केलेल्या मागणीसंदर्भात BCCI नं नेमकी काय भूमिका आहे? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बैठकीत नेमकं काय घडलं?
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबतच्या या बैठकीत सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कामकाजाचा आढावा घेतला. याशिवाय भारत-अ आणि भारतीय अंडर-१९ संघांचे दौरे एकाच वेळी होऊ नयेत, यावरही चर्चा करण्यात आली. सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये अनेक पदे रिक्त असून त्यामध्ये शिक्षण प्रमुख आणि क्रीडा विज्ञान प्रमुख या महत्त्वाच्या पदांचाही समावेश आहे.
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जमली होती मंडळी
या बैठकीनंतर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, "सेंटर ऑफ एक्सलन्समधील रिक्त पदांबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरात तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी आम्ही शक्य तितक्या लवकर या पदांवर नियुक्त्या करू." ते पुढे म्हणाले की, COE च्या तयारीचा आणि कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी ही योग्य वेळ होती. सध्या तिथे तीन मैदानांवर सामने सुरू असून त्यामध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामनेही खेळवले जात आहेत. तसेच भविष्यात भारतीय अ संघाच्या दौऱ्यांचे नियोजन कसे असावे, यावरही चर्चा झाली. कधी कधी भारतीय अ संघ आणि वरिष्ठ संघ एकाच वेळी दौऱ्यावर असतात. हे टाळणे गरजेचे आहे. भारतीय अ संघाचे दौरे भविष्यातील खेळाडू घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असेही सैकिया यांनी म्हटले आहे.
'त्या' वादग्रस्त मुद्यावर BCCI नं आखली आहे 'लक्ष्मणरेषा'
सध्याच्या घडीला क्रिकेट वर्तुळात वादग्रस्त ठरत असलेल्या मुद्यावरही बीसीसीआयनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बांग्लादेशने टी २० वर्ल्ड कपमधील सामने भारताबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. यावर देवजीत सैकिया म्हणाले की, "या बैठकीत त्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक फक्त COE आणि इतर क्रिकेटविषयक मुद्द्यांपुरतीच मर्यादित होती. हा विषय आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. यावर अंतिम निर्णय आयसीसी घेईल." बीसीसीआय सचिवांचे हे स्पष्टीकरण BCCI नं या मुद्यावर लक्ष्मणरेषा आखल्याचे अधोरेखित करणारी आहे.