Join us  

BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव

BANW vs INDW 2nd T20 Match: टीम इंडियाने यजमान बांगलादेशला नमवून सलग दुसरा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 7:44 PM

Open in App

BANW vs INDW 3nd T20 Match | सिल्हेट : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमानांचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव केला. सिल्हेट येथे झालेल्या सामन्यात पावसाने बॅटिंग केल्याने यजमानांना चांगलाच फटका बसला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला पण पाऊस बराच वेळ न थांबल्याने पाहुण्या भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ अवघ्या ११९ धावांत गारद झाला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. मुर्शिदा खातूनने सर्वाधिक (४९) धावा करत भारताला आव्हान दिले. पण, राधा यादवच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. भारतासाठी तिने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. 

बांगलादेशने दिलेल्या १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सुरुवातीलाच शेफाली वर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. तिला मरूखा एक्टरने बाहेरचा रस्ता दाखवला. मग दयानथा हेमालथाने (२४ चेंडूत नाबाद ४१ धावा) स्फोटक खेळी केली, तिला उपकर्णधार स्मृती मानधनाने (नाबाद ५ धावा) साथ दिली. ५.२ षटकांत भारताची धावसंख्या १ बाद ४७ धावा असताना पावसाचे आगमन झाले अन् खेळ थांबला. मग DLS Method नुसार १९ धावांनी भारताला विजयी घोषित करण्यात आले. 

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

२ मे - तिसरा सामना - सिल्हेट

६ मे - चौथा सामना - सिल्हेट

९ मे - पाचवा सामना - सिल्हेट

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघहरनमप्रीत कौरस्मृती मानधना