दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या T20I मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील बापू अर्थात अक्षर पटेल याने उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो प्लेइंगन बाहेर पडला. कर्णधार सूर्यकुमार यादवनं आजारी असल्यामुळे संघात बदल करण्यात आल्याची माहिती दिली होती. आता बीसीसीआयने अक्षर पटेल उर्वरित मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI नं अक्षर पटेल संदर्भातील शेअर केली मोठी माहिती
बीसीसीआयने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “टीम इंडियाचा अष्टपैलू अक्षर पटेल आजारपणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन टी-२० सामन्यासाठी उपलब्ध नसेल. तो लखनौमध्ये संघासोबत आहे. BCCI मेडिकल टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, असा उल्लेख बीसीसीआयने आपल्या केला आहे.
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
शाहबाज अहमदची टीम इंडियात वर्णी
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने लखनौ आणि अहमदाबादच्या मैदानात खेळणार आहे. या दोन सामन्यासाठी अक्षर पटेलच्या जागी शाहबाज अहमदची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. शाहबाज अहमद याने ९ ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच वर्षी ४ डिसेंबर २०२२ रोजी तो बांगलादेशविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तीन महिन्यात फक्त ३ सामने खेळून संघाबाहेर राहिलेल्या या खेळाडूला पुन्हा एकदा पुनरागमनाची संधी मिळाली आहे.
IPL मधील कामगिरी
३१ वर्षी शाहबाज अहमद बॉलिंग ऑलराउंडर आहे. IPLमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून ५८ सामन्यातील ३८ डावात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने ५४५ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ४५ डावात त्याच्या खात्यात २२विकेट्स जमा आहेत. ७ धावा खर्च करून ३ विकेट्स ही आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारतीय संघाची मालिकेत २-१ अशी आघाडी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतीनंतर भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. लखनौच्या मैदानातील चौथा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत बरोबरीचा डाव साधण्यासाठी मैदानात उतरेल. ही लढत १७ डिसेंबरला रंगणार आहे. त्यानंतर १९ डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानातील लढतीनं दोन्ही संघातील मालिकेची सांगता होणार आहे.