Yashasvi Jaiswal Fire Against Mitchell Starc And Set Ne Record In Test : सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात युवा समामीवीर यशस्वी जैस्वाल याने टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालनं चार खणखणीत चौकार ठोकत १६ धावा केल्या. या खेळीसह त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे.
स्टार्कच्या गोलंदाजीवर ४ खणखणीत चौकार
मिचेल स्टार्कच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालनं कट शॉट मारत थर्ड मॅनच्या दिशनं खणखणीत चौकारासह आपलं अन् संघाचं खातं उघडले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर युवा बॅटरनं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चौकार मारला. एवढ्यावर त्याचं मन भरलं नाही. चौथ्या चेंडूवर त्याने सुरेख बॅकफुट पंचचा नजराणा पेश करत सलग तिसरा चौकार मारला. जो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन गेला. पाचवा चेंडू निर्धाव खेळल्यावर अखेरच्या चेंडूवरही यशस्वीनं डीप कव्हरच्या दिशनं चौकार मारला.
यशस्वीनं साधला विक्रमी डाव
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात याआधी जी कामगिरी कुणालाच जमली नाही तो डाव यशस्वीनं चार चौकाराच्या मदतीने साधला. डावाच्या पहिल्याच षटकात १६ धावांसह सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम जैस्वालनं आपल्या नावे केला आहे. यशस्वी जैस्वाल आणि स्टार्क यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चांगलीच टक्कर पाहायला मिळाली आहे. यावेळी दोघांच्यातील शीतयुद्धात यशस्वीनं बाजी मारली. पण चांगली सुरुवात केल्यावर तो बोलँडच्या गोलंदाजीवर फसला.
३५ चेंडूत २२ धावा करून तंबूत परतला यशस्वी
स्टार्कच्या पहिल्या षटकातील चार खणखणीत चौकाराच्या मदतीने जबरदस्त संघाला दमदार सुरुवात करून देणारा यशस्वी जैस्वाल स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर फसला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं आक्रमक अंदाजात खेळण्याच्या मूडमध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालला २२ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.