AUS vs IND 3rd Day 4 : Stumps ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपनं फॉलोऑनची नामुष्की टाळली. आघाडीच्या फळीतील फलंदाजांमुळे अडचणीत फसलेल्या टीम इंडियाला दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी बॅटिंगचे धडेच दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर असला तरी बुमराह-आकाशदीप यांची जिगरबाज खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी ठरली. कारण या जोडीनं जिगर दाखवत 'मॅजिक फिगर'चा अर्थात फॉलोऑन टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या २४६ धावांचा आकडा पार केला.
बुमराह-आकाशदीप जोडीमुळे मोठं संकट टळलं
केएल राहुलच्या ८४ (१३९) दमदार अर्धशतकानंर रवींद्र जडेजानं ७७ (१२३) केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं २०० धावांचा आकडा पार केला. पण भारतीय संघाच्या धावफलकावर २१३ धावा असताना जड्डू बाद झाला अन् भारतीय संघावर १३ वर्षांनी फॉलोऑनची नामुष्की ओढावण्याचे संकेत दिसू लागले. पण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप या जोडीकडून आवश्यक असणाऱ्या ३३ धावा करत संघावरच मोठं संकट टाळलं. या जोडीनं ३९ धावांची दमदार भागीदारी करत फॉलोऑनची नामुष्की टाळली. चौथ्या दिवसाअखेर दोघांनी नाबाद राहून भारताच्या धावफलकावर ९ बाद २५२ धावा लावल्या. फॉलोऑनची नामुष्की ओढावली असती तर टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार दिसली असती. पण आता ऑस्ट्रेलियाला पुन्हा बॅटिंग करावीच लागेल. त्यामुळे सामना अनिर्णित राहून पराभव टाळणं भारतीय संघासाठी सहज सुलभ होईल.
आघाडीच्या फलंदाजीत चौघांना नाही गाठता आला दुहेरी आकडा; रोहित शर्मा तिथ पोहचून फसला
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल पुन्हा अपयशी ठरला. त्याने २ चेंडूत फक्त ४ धावा केल्या. शुबमन गिल ३ चेंडूत १ धावा करून माघारी फिरला. विराट कोहलीनं १६ चेंडूत ३ धावा करत तंबूचा रस्ता धरला. रिषभ पंतलाही या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो १२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. हे चार गडी दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा इथपर्यंत पोहचला. पण १० धावांवर तोही बाद झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागील दोन कसोटी सामन्यात दमदार खेळी करणारा नितेश कुमार रेड्डीनं ६१ चेंडूचा सामना केला. पण यावेळी त्याने संघाच्या धावसंख्येत फक्त १६ धावांची भर घातली.
पॅट कमिन्सनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स
लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी टीम इंडिया बॅकफूटवर राहिली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शच्या खात्यात ३ विकेट्स जमा झाल्या. या दोघांशिवाय जोश हेजलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.
Web Title: Australia vs India 3rd Test Day 4 Stumps Jasprit Bumrah Akash Deep help India avoid follow-on
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.