AUS vs IND 3rd Test, Day 3 Stumps : ब्रिस्बेन येथील गाबा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे टीम इंडिया पुन्हा अडचणीत सापडलीये. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव ४४५ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण एका बाजूला पावसाचा खेळ सुरु असताना दुसऱ्या बाजूला भारतीय फलंदाजांनी निराश केले. पावसाच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला बॅटिंगसाठी खूपच कमी वेळ मिळाला. त्यातही आघाडीच्या चौघांनी अगदी स्वस्तात तंबूचा रस्ता धरला. परिणामी पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययामुळे भारतीय संघाच्या पहिल्या डावात फक्त १७ षटकांचा खेळ झाला. यात कुणालाच मैदानात तग धरण्याची हौस दिसली नाही. त्यामुळे पाऊस पडला तेच बरं अशी म्हणायची वेळ आली. सध्याच्या घडीला भारतीय संघाची जी अवस्था दिसतीये त्यात फक्त पावसानं बॅटिंग केली तरच टीम इंडिया वाचवू शकेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
स्टार्कचा जबरदस्त स्टार्ट, टीम इंडियाची खराब सुरुवात
सलामी जोडीत कोणताही बदल न करता यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारून यशस्वीनं या डावात अपयशी ठरणार नाही, या इराद्याने मैदानात उतरल्याचे संकेत दिले. पण दुसऱ्याच चेंडूवर स्टार्कनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या षटकातच भारतीय संघानं अवघ्या ४ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला स्टार्कनं आणखी एक धक्का दिला. बॅक टू बॅक ओव्हरमध्ये त्याने दिलेल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही.
विराट कोहलीसह पंतही आटोपला स्वस्तात
आघाडीच्या फलंदाजीतील दोन विकेट्स गमावल्यावर सर्वांच्या नजरा या विराट कोहलीवर खिळल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शंभरावा कसोटी सामना खेळणारा विराट कोहलीला जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर फसला. त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तो १६ चेंडूत अवघ्या ३ धावा करून परतला. पॅट कमिन्सनं रिषभ पंतचा खेळ खल्लास करत टीम इंडियाच टेन्शन आणखी वाढवलं. भारतीय संघानं ४४ धावांवर आपल्या पहिल्या ४ विकेट्स गमावल्या.
KL राहुल एकदम सेट; हिटमॅनला एक ओव्हर खेळूनही उघडता आलं नाही खातं
आघाडीच्या चार फलंदाजांनी तंबूचा रस्ता धरल्यावर आता संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्यावर आहे. सलामीला आलेल्या लोकेश राहुलनं कर्णधाराच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी १० धावांची भागीदारी केली. यातील ९ धावा या राहुलनं केल्या आहेत. तो ६४ चेंडूचा सामना करून ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावांवर नाबाद खेळत आहे. रोहित शर्मा ६ चेंडू खेळूनही खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ट्रॅविस हेड १५२ (१६०) आणि स्टीव्ह स्मिथ १०१ (१९०) या दोघांच्या शतकी खेळीनंतर अॅलेक्स कॅरीनं ७० (८८) केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजच्या खात्यात २ विकेट्स तर आकाशदीप आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.