Australia vs India, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडिलेडच्या मैदानात सुरु आहे. पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कनं भारतीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याची विकेट घेत टीम इंडियाला पहिला धक्का दिला.
केएल राहुल-शुबमन गिल जोडी सेट झाली, पण स्टार्क आला अन् ही जोडी फुटली
पहिल्या बॉलवर पहिली विकेट गमावल्यानंतर लोकेश राहुल आणि शुबमन गिल यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. पण स्टार्क पुन्हा आला अन् त्याने भारताची सेट झालेली ही जोडी फोडली. लोकेश राहुलच्या रुपात त्याने भारतीय संघाला दुसरा धक्का दिला. लोकेश राहुलनं ६४ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. ज्यात त्याच्या भात्यातून ४ चौकार आल्याचे पाहायला मिळाले.
किंग कोहलीही ठरला फेल, स्टार्कनंच टीम इंडियाला दिला 'विराट' धक्का
अॅडिलेडच्या मैदानात दमदार रेकॉर्ड असणाऱ्या किंग कोहलीवर सर्वांच्या नजरा होत्या. त्याने दिमाखात सुरुवात केली. पण तोही स्टार्कच्या चेंडूवर फसला. विराट कोहलीच्या रुपात स्टार्कनं टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. तो फक्त ७ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर बोलंड याने शुबमन गिलची विकेट घेतली. गिलनं ५१ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीनं ३१ धावा केल्या. भारतीय संघानं पहिल्या सत्रातील २३ षटकांच्या खेळात ८२ धावांवर ४ विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले. मिचल स्टार्कनं ३ विकेट्स घेत पहिल्या सत्रात आपली जादू दाखवून दिली.