Australia vs India, 1st Test Day 2 Stumps : पर्थ कसोटी सामन्यातील दुसरा दिवस भारतीय सलामी जोडीनं गाजवला. कांगारुंचा डाव १०४ धावांत आटोपल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. दोघांनी कोणतीही घाई गडबड न करता भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतीय संघाने धावफलकावर बिन बाद १७२ धावा लावल्या होत्या. यशस्वी जैस्वालनं १९३ चेंडूत ७ चौकारआणि २ षटकारांच्या मदतीने ९० धावांवर नाबाद परतला. दुसरीकडे लोकेश राहुलनं १५३ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या होत्या. तोही नाबाद असून भारतीय संघाने पर्थ कसोटी सामन्यात २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवशी खास विक्रमावर असतील यशस्वी जैस्वाल अन् लोकेश राहुलच्या नजरा
यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या सलामी जोडीनं २० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियन मैदानात शतकी भागीदारी रचली. आता या जोडीला खास विक्रम खुणावत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात २० धावांची भर घालून ही जोडी सुनील गावसकर आणि के श्रीकांत या जोडीनं सेट केलेला ऑस्ट्रेलियातल सलामी जोडीच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मागे टाकू शकतात. गावसकर आणि श्रीकांत या जोडीनं १९८६ मध्ये १९१ धावांची भागीदारी रचल्याचा विक्रम आहे. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल दोघांना शतकी खेळी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अगदी दाबात करण्याची संधी देखील आहे.
गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाच कमबॅक, मग सलामी जोडीनं पाडले कांगारुच्या ताफ्यातील गोलंदाजांचे खांदे
पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय संघाचा डाव १५० धावांत आटोपला होता. पण गोलंदाजांनी दमदार कमबॅक करून दिल्यावर दुसऱ्या डावात भारतीय सलामी जोडीच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघ पर्थ कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे या जोडीच्या खेळीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. घरच्या मैदानावर दुसऱ्या दिवशीच कांगारुंची धाकधूक वाढली आहे. कारण सध्याची परिस्थितीत पाहता भारतीय संघ कांगारूंसमोर ३०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट अगदी सहज ठेवू शकेल. चौथ्या डावात हे आव्हान पार करणे कांगारु संघासाठी मोठी कसोटीच असेल.